Yojana

गणिताशी गट्टी

गणिताशी गट्टी असलेला विद्यार्थी तसा विरळाच. अनेकांसाठी तर अभ्यासातला मोठा शत्रू म्हणजे गणित असतो. अनेकांचे शिक्षण थांबते, ते केवळ गणिताशी असलेल्या कट्टीमुळेच. आत्तार सरांनी नेमके हेच पाहिले आणि ठरविले की मुलांची गणिताशी दोस्ती करून दिली पाहिजे. त्याच भावनेतून ते विविध उपक्रम राबवत आहेत. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन केले तर ते अधिक प्रभावी व परिणामकारक होते, हे लक्षात घेऊन त्यांनी उपक्रमांची आखणी केली आहे.

त्यांनी राबवलेल्या उपक्रमांत https://www.ted.com/ या संकेतस्थळाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देणे, याचा प्रामुख्याने समावेश करता येईल. विद्यार्थ्यांना अनेक वह्य़ा-पुस्तके वापरून दप्तराचे ओझे होते, त्यामुळे ते कमी करण्यासाठी आत्तार सरांनी चक्क ऑनलाइन गृहपाठ द्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी जिओजेब्रा या सॉफ्टवेअरचा वापर केला. त्यांच्या शाळेत सन २००९ ते २०१४ या काळात न्यू कॅसल विश्व विद्यापीठाच्या मदतीने SOLE (सेल्फ ऑर्गनाइज्ड लर्निग एन्व्हायरन्मेंट) हा उपक्रम राबवला. त्याअंतर्गत जगभरातील २००पेक्षा जास्त शिक्षक या खेडय़ातल्या शाळेला ऑनलाइन भेट देऊन शिकवू लागले. स्काइप (SKYPE) च्या साथीने हे शिक्षक विद्यार्थ्यांचे वर्ग घेत असत. आठवडय़ाला सरासरी ३-४ मीडिएटर्स विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. आजही या प्रकारचे शिक्षण त्यांच्या शाळेत सुरू आहे.  http://www.arvindguptatoys.com या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून आत्तार सरांच्या शाळेतील विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनात आपले प्रकल्प मांडतात. त्यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते आणि हसतखेळत संकल्पनाही पक्क्या होतात. या सगळ्याचाच परिपाक म्हणून गेली १२ वर्षे त्यांच्या शाळेचा दहावीचा निकाल अतिशय उत्तम लागत आहे.

त्यांचे अनेक उपक्रम चालू आहेतच, परंतु सध्या त्यांनी नवीन सुरू केलेला उपक्रम म्हणजे गणिताच्या जीआयएफचा. जीआयएफ इमेज म्हणजे सध्या व्हॉट्स अ‍ॅप आणि इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा प्रकार. काही सेकंदातली हलती चित्रे दाखवणारी ही चित्रफीत म्हणजे जीआयएफ. तरुणाईमध्ये याची असलेली आवड लक्षात घेऊन त्यांनी चक्क गणिताच्या जीआयएफ इमेज बनवल्या आहेत.

विद्यार्थ्यांना प्रामुख्याने अवघड वाटणारे विषय म्हणजे गणित आणि इंग्रजी. त्यातही ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी तर भलतेच कठीण वाटणारे विषय. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यावर आत्तार सरांच्या लक्षात आले की, यांना बऱ्याच संकल्पना, गुणधर्म, सिद्धता, प्रमेय यासारख्या गोष्टी समजून घ्यायला अवघड जातात. त्यामुळे मग ते पाठांतराची मदत घेतात आणि तिथेच फसतात कारण गणितात नुसते पाठांतर असून भागत नाही तर मूळ संकल्पना समजणे अत्यावश्यक असते. त्यामुळेच एखादे प्रमेय वेगळ्या पद्धतीने सोडवायचे म्हटल्यास या मुलांना ते जमत नाही. परीक्षेत कमी गुण मिळतात आणि ती मुले हताश होऊन गणिताकडे पाठ फिरवतात. यासाठी सरांनी संगणकाच्या साथीने मात करायची ठरवली. त्यावेळी त्यांना सापडले ते  https://phet.colorado.edu/  हे संकेतस्थळ. इथे सिम्युलेशन्सचा प्रत्यक्ष शिकवण्यामध्ये केलेला वापर दाखवलेला आहे. अनेक अमूर्त संकल्पना स्पष्ट करताना या सिम्युलेशन्सचा सरांना उपयोग झाला. आणि एक गोष्ट लक्षात आली की, जर एखादा गुणधर्म चलचित्राच्या साहाय्याने दाखवला तर तो समजण्यास सोपा पडतो. त्यानुसार जिओजेब्रा या सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यांनी स्वतच्या अभ्यासक्रमात असलेले साहित्य बनवण्यास सुरुवात केली. शाळा जरी आडगावातली असली तरी त्यातील सरासरी ८० टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाइल होते. मग त्याचा सुयोग्य उपयोग करून घेण्याचे सरांनी ठरवले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये Geogebra अ‍ॅप डाऊनलोड करून दिले आणि वर्गातच त्यांच्याकडून जिओजेब्राच्या साहाय्याने गणिते सोडवण्याचा सराव सुरू केला. याला उत्तम प्रतिसाद मिळाला. मग सरांच्या मनात विचार आला की जी शैक्षणिक साधने आपण जिओजेब्राच्या साहाय्याने तयार करत आहोत, ती जर थेट विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये दिली तर त्यांना ती वारंवार वापरता येतील. पाहता येतील. मग त्यांना घरीही अभ्यास करता येईल. म्हणून मग त्यांनी हे सगळे साहित्य चक्क जीआयएफ स्वरूपात रूपांतरित केले. विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून चक्क दररोज दोन गुणधर्माचे जीआयएफ पाठवायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना हे व्हॉट्स अ‍ॅपवरून भेटीला आलेलं गणित चांगलंच भावलं. त्यांच्या अभ्यासात सुधारणा दिसू लागली. गेल्यावर्षी त्यांच्या वर्गातील चार विद्यार्थ्यांना दहावीच्या गणितात पैकीच्या पैकी गुण प्राप्त झाले होते. या उपक्रमामुळे मुलांना इतरही चांगल्या सवयी लागल्या आहेत. उदा. गणिताची कोडी सोडवणे. यामुळे बुद्धीला चालना मिळते. जे शिकलो ते प्रत्यक्ष वापरून पाहण्याची सवय लागते. आता विद्यार्थ्यांना गणित ऑलम्पियाड, संबोध आणि प्रावीण्यसारख्या परीक्षांनाही बसण्याची गोडी लागू लागली आहे. आजतागायत आत्तार सरांनी सुमारे ६००-७०० गुणधर्म जीआयएफस्वरूपात तयार केले असून. दररोज ते अनेकांना पाठवत असतात.  हा प्रयोग त्यांनी केवळ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित ठेवलेला नाही. त्यांच्या संपर्कातल्या अनेक शिक्षकांनाही ते हे जीआयएफ पाठवत असतात. तेही अगदी विनामूल्य. व्हॉट्सअ‍ॅपवरून इतरवेळी येणाऱ्या वायफळ पोस्टऐवजी या नाचऱ्या आकृत्या विद्यार्थ्यांची गणिताची भीती पार घालवून टाकतायत, हे मात्र खरे.

 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव><शहराचे नाव><नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------