प्रयोजनवाद –
एखाद्या कृतीच्या परिणामावरून त्या कृतीची नतिकता ठरविणाऱ्या नीतिशास्त्रातील सिद्धांताला प्रयोजनवाद असे म्हणतात. प्रयोजनवादाच्या गाभ्याशी ‘व्यक्ती काय करते?’ – म्हणजेच त्याच्या कृती आहेत. आणि त्या कृतींचे मूल्यमापन हे समोर येणाऱ्या परिणामांच्या चांगले-वाईटपणावर आधारित असते. वरवर पाहता या सिद्धांताद्वारे नतिक मूल्यमापनाचा एक थेट निकष समोर ठेवला जातो. परंतु ‘चांगले’ परिणाम कोणते हे ठरविण्यासाठी मुळात ‘चांगले’ म्हणजे नेमके काय हे माहीत असणे ही एक पूर्वअट आहे. ‘चांगले’ म्हणजे काय – हे व्यक्तीला अगोदरच माहीत असल्याचे हा सिद्धांत गृहीत धरतो. ही बाब मान्य केल्यास पुढचा प्रश्न असा पडू शकतो की मग ‘चांगले परिणाम’ नेमके कोणते? बहुसंख्यांना आनंद देतील ते की साधारणत: जास्तीतजास्त आनंदाची निर्मिती करतील ते? किंवा चांगल्या परिणामांची काही वेगळीच व्याख्या असावी? मुळातच ‘चांगले’ म्हणजे काय हे माहीत नसेल तर एखाद्या कृतीचा परिणाम हा बरोबर आहे किंवा कसे हे ठरविता येत नाही.
प्रयोजनवादी नीतिशास्त्राचे प्रमुख उदाहरण म्हणजे उपयुक्ततावाद. जास्तीतजास्त लोकांचे जास्तीतजास्त कल्याण साधणारी कृती ही बरोबर, तर आनंद नाहीसा होईल असे परिणाम साधणारी कृती ही चूक असे हा सिद्धांत मानतो. परंतु परिणामांवरून कृतीचे नतिक मूल्य ठरते एवढेच सरळसोटपणे म्हणूनही चालत नाही. कारण कृती करताना व्यक्तीला अपेक्षित असलेले परिणामच शेवटी साध्य होतील असे नव्हे. पूर्णत: वेगळे किंवा अपेक्षित परिणामांबरोबर आणखी काही परिणामही शेवटी समोर येऊ शकतील; अशा परिस्थितीत मूल्यमापन नेमके कुठल्या परिणामांवरून करायचे असा प्रश्न उद्भवू शकतो. तसेच व्यक्तीने वाईट हेतूने एखादी कृती केली – परंतु तिचे परिणाम मात्र अनपेक्षितरीत्या चांगले झाले – तर ती कृती ‘चांगली’ ठरते काय? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.
सुखवाद –
सुखवाद म्हणजे सुख हेच समाजाचे एकमेव ध्येय असले पाहिजे असा सांगणारा वाद होय. सुखवादाचा मुख्य प्रकार म्हणजे सार्वत्रिक सुखवाद. सार्वत्रिक सुखवादालाच उपयुक्ततावाद म्हणतात. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधुनी पाहे’ असे म्हणून संत रामदासांनीसुद्धा सुखाचा शोध घेण्याचे सुचविले. सुख म्हणजे काय? काय मिळविले म्हणजे सुख मिळविले? ही एक गंभीर समस्या आहे. तिचा सखोल काय, पण उथळ विचारसुद्धा न करता लोक सुखाच्या मागे लागतात, हीच एक गंभीर गोष्ट आहे. बहुधा ज्यापासून सुख प्राप्त होते त्या वस्तूलाच ते सुख समजतात. उदा. ‘शांत अखंड झोप म्हणजे सुख’ असे असताना ‘सुंदर मऊ बिछाना म्हणजे सुख’ समजले जाते. पण बिछाना विकत मिळतो, झोप नव्हे. सुख हे साध्य व सुख देणारी वस्तू हे साधन असते, पण साधनालाच साध्य समजण्याची चूक लोक करतात.
सुखाची प्रत्येकाची कल्पना ही भिन्न असते. सॉक्रेटीसच्या मते सुखी डुकरापेक्षा दुखी माणूस बरा वाटतो. सुख हे वस्तुत: एका भावनेला दिले गेलेले नाव आहे. करुणा, प्रेम, तिरस्कार या जशा भावना आहेत तशी सुख हीसुद्धा एक भावना आहे. पण सुख, समाधान आणि आनंद यातही फरक आहे. या तिन्ही भावनाच आहेत, पण सुखाचा दर्जा उच्च असतो तर समाधान आणि आनंद उच्च असतातच असे नाही. शिवाय आनंद हा विकृतसुद्धा असू शकतो. म्हणून सुखाची व्याख्या पुढीलप्रमाणे देता येते –
‘विशिष्ट स्वरूपाची व इष्ट इच्छेची पूर्ती करणे म्हणजे सुख’. पण येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हवे असणे व इष्ट असणे यात फरक आहे. जे इष्ट असते ते सुख-समाधान देतेच असे नाही. म्हणून ‘जे इष्ट असेल आणि समाधानही देईल त्याला सुख म्हणता येईल.’ म्हणून ‘इष्ट समाधानाची पूर्ती म्हणजे सुखाची भावना’ अशी योग्य व्याख्या देता येईल.
मिलचा सार्वत्रिक सुखवाद
जेरेमी बेन्थम या इंग्लिश तत्त्वज्ञाने उपयुक्ततावादाचा विचार पहिल्यांदा समोर आणला. जास्तीतजास्त लोकांसाठी जास्तीतजास्त सुख (maximum good for maximum people) या तत्त्वप्रणालीचा त्याने पुरस्कार केला. या तत्त्वानुसार जास्तीतजास्त लोकांना मिळणारे सुख म्हणजेच – ‘परिणाम’ – बेंथमसाठी खूप महत्त्वाचे होते. उपयुक्ततावादाच्या विचारानुसार निर्णयाचे परिणाम जर का समाधानकारक किंवा आनंददायी असतील तर, निर्णयाच्या मार्गाचा फारसा विचार करण्याची गरज निर्माण होत नाही. यालाच ‘Ends justify means’ असेही म्हणतात.
जे. एस. मिल म्हणजे जेरेमी बेंथम या उपयुक्ततावादी तत्त्वज्ञाचा मित्र जेम्स मिलचा मुलगा. जे. एस. मिल हा बेंथमचा विद्यार्थी. बेंथमच्या विचारांवर अधिक संस्कार करून मिलने आपला विचार मांडला. मिलचा सिद्धांत पुढीलप्रमाणे –
‘प्रत्येक व्यक्तीला सुखच हवे असते.’ – हा त्याचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत दोन गृहीत तत्त्वांवर आधारलेला आहे ती अशी :
(१) प्रत्येक माणसाला फक्त सुखच हवे असते.
(२) माणूस ज्याची इच्छा करतो, असे जे आहे ते केवळ सुखच असते.
पण इथे नतिक पेच असा आहे की, ‘सुखाची इच्छा चांगली असते.’ या विधानात सुख आणि इच्छा अशा दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. मिल त्या एकच समजतो. आता पेच असा आहे की, सुख हे नेहमी हितकारकच असते असे नाही. म्हणून मिलच्या सुखवादावर आक्षेप घेता येतील ते असे,
सुखवादावरील आक्षेप
(१) पहिला आक्षेप असा की एखाद्या गोष्टीची इच्छा केली जाते म्हणून तिची इच्छा करणे योग्य आहे असे सिद्ध होत नसते. कशाची इच्छा करणे योग्य आहे? हा नीतिशास्त्रीय प्रश्न आहे. दुखाचीही इच्छा करता येते. पण मिल माणसाने सुखाचीच इच्छा करावी, असा आग्रह करतो.
(२) दुसरा आक्षेप असा की, एकदा सुख हेच चांगले असते, हे पक्के झाले की, ‘जितके जास्त सुख तितके जास्त चांगले’ असे म्हणता येते. पण व्यवहारात तसे दिसत नाही.
मिलला आक्षेपांची जाणीव होती. म्हणून तो सुखामध्ये प्रकार पाडू इच्छितो. त्याने सुखाचा दर्जा ठरविण्याचे महत्त्वाचे काम केले आणि त्यासाठी आवश्यक संकल्पनात्मक मांडणीही केली. ती कोणती, हे आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत. तसेच या संकल्पनेवर आधारित यूपीएससीने आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा आढावादेखील घेणार आहोत.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव><शहराचे नाव><नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------