विद्यार्थी मित्रांनो गेल्या काही लेखांत आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इतिहास, भूगोल आणि सामान्य विज्ञान या विषयांचा आढावा घेतला. या विषयांच्या अभ्यासासाठी नेमके कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे लागेल याची चर्चा केली. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना सामान्य अध्ययन पेपर एक मध्ये अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुळात इतिहास, भूगोल,
पंचायत राज, सामान्य विज्ञान हे विषय आपण शाळेच्या प्राथमिक स्तरापासून अभ्यासत आलेलो आहोत. त्यामुळे त्या विषयांची भाषा समजून घेणे आपल्याला सोपे जाते. परंतु अर्थशास्त्राची भाषा मात्र तुलनात्मकदृष्टय़ा कठीण वाटते. परंतु एकदा का अर्थशास्त्रीय संकल्पना समजल्या की आपोआपच या संकल्पनांची दैनंदिन जीवनातील घटनांशी सांगड घालायला जमू लागते आणि अर्थशास्त्र या विषयात गोडी वाटू लागते. येत्या ८ एप्रिलला होणाऱ्या परीक्षेसाठी अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करावा त्यातील कोणत्या घटकांवर अधिक भर द्यावा आणि नेमका अभ्यास कसा करावा याविषयी आपण या लेखात चर्चा करू या.
* अभ्यासक्रम
आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमात ‘आर्थिक व सामाजिक विकास – शाश्वत विकास, दारिद्रय़, समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्र उपक्रम इत्यादी’ इतक्याच मुद्दय़ांचा स्पष्ट उल्लेख केला आहे, परंतु याच अभ्यासक्रमाची जर फोड केली तर यामध्ये अर्थशास्त्रीय संकल्पना, त्यांचा चालू घडामोडींशी संबंध, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व्यापार आणि त्याचे इतर आयाम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाची उद्दिष्टय़े, सहकारी संस्था आणि त्यांची कार्ये, दारिद्रय़, दारिद्रय़ाच्या संकल्पना, दारिद्रय़ रेषा, दारिद्रय़ कमी करण्यासाठीच्या विविध उपाययोजना, त्यासाठी नेमलेल्या समित्या व त्यांच्या शिफारशी, विविध सरकारी योजना त्यांचा उद्देश, लाभार्थी, योजनेचे मूल्यमापन, राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी वित्तनिर्मितीच्या पद्धती, नियोजन आयोग, नीती आयोग, पंचवार्षिक योजना, भूअधिकार सुधारणा धोरण, आंतरराष्ट्रीय परिषदा व त्यांचे मूल्यमापन, राष्ट्रीय लोकसंख्या धोरणे, महिला सक्षमीकरण धोरण, २०११ची जनगणना, आसियान, संयुक्त राष्ट्र संघटना, नाटो, अशा संघटना व त्यांची कार्ये, दारिद्रय़ निर्देशांक, मानव विकास अहवाल, लिंग असमानता निर्देशांक, त्यांची मानके, भारतीय रिझव्र्ह बँक आणि तिची कार्ये, भांडवल बाजार, नाणे बाजार या घटकांचा प्रामुख्याने समावेश होतो. या प्रमुख घटकांना मध्यवर्ती ठेवून आपल्या अभ्यासाची रणनीती ठरविल्यास अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे तारू पलतीराला घेऊन जाणे निश्चितच शक्य आहे.
* अभ्यासाची रणनीती
१) प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण – अभ्यासाची रणनीती ठरविताना जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावर अधिक भर देणे क्रमप्राप्त आहे. यानुसार दर वर्षी पूर्वपरीक्षेमध्ये साधारणपणे १० ते १५ प्रश्न अर्थशास्त्राशी संबंधित असल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षांतील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा जर बारकाईने अभ्यास केला तर खालीलप्रमाणे प्रश्नांचे विभाजन दिसून येईल.
२) अर्थशास्त्र आणि आकडेवारी – राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भात अर्थशास्त्र म्हणजेच आकडेवारी असा गैरसमज बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसला आहे. तो दूर करण्यासाठी केवळ गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषणच पुरेसे आहे. मुळात या विषयातील अधिकाधिक प्रश्न हे विविध संकल्पनांवर केंद्रित असतात. जीडीपी, जीएनपी यांच्या व्याख्या जशा महत्त्वाच्या आहेत तशाच घटक किमती आणि बाजारभावाची संकल्पनाही महत्त्वाची आहे. विविध संस्थांची स्थापना वर्षे तर महत्त्वाची आहेतच पण त्याचबरोबर नव्याने उदयास येऊन आपले स्थान निर्माण करणारे चिनी युआन, बिटकॉइनसुद्धा महत्त्वाचे आहेत. मात्र जनगणनेच्या अहवालासारखी किंवा मानव विकास निर्देशांकासंबंधीची आकडेवारी मात्र तोंडपाठ असणे अत्यावश्यक आहे.
३) अर्थशास्त्रातील संकल्पना – स्पर्धा परीक्षांमधील अर्थशास्त्र समजण्यासाठी त्यातील भांडवल बाजार, नाणेबाजार, व्यापार, राजकोषीय धोरण, वित्तीय धोरण, मुद्रा धोरण या संदर्भातील विविध संकल्पना सहज सोप्या भाषेत समजून घेतल्या पाहिजेच. तसेच त्यांची दैनंदिन व्यवहाराशी सांगड घातल्यास अर्थशास्त्र अभ्यासणे आनंददायी होऊ शकते.
४) महाराष्ट्राच्या व भारताच्या आर्थिक पाहणीचा अभ्यास – भारत व महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित होणाऱ्या आर्थिक पाहणीमधून चालू घडामोडींमधील अर्थशास्त्राचा चेहरा समोर येतो. त्यामुळे या दोन प्रकाश्नांचा अभ्यास करणे अनिवार्य ठरते. यामधील प्रत्येक घटकाचा तुलनात्मक अभ्यास करून सद्य:स्थितीतील आर्थिक घडामोडींचा प्रवाह trend अभ्यासणे गरजेचे आहे. (यामध्ये बरीच आकडेवारी असते जी दुर्लक्षित करून महत्त्वाचे trend बघणे आवश्यक आहे.)
पुढील लेखामध्ये आपण आत्तापर्यंत आर्थिक व सामाजिक विकास या घटकावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची चर्चा करू या. तसेच ते सोडविण्यासाठी वापराव्या लागणाऱ्या स्रोतांची चर्चा करू या.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------