मराठी व्याकरण

शुध्दलेखन

 

माणसाच्या भाषेवर त्या, त्या प्रदेशाचे आणि तेथील वातावरणाचे संस्कार होत असतात. या परिणामापासून कोणत्याही समाजाची भाषा अलिप्त राहू शकत नाही. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात (विदर्भ, खानदेश, कोकण, सातारा, कोल्हापूर) ती वेगवेगळ्या बोलीच्या रुपात अवतरलेली दिसेल. प्रत्येक प्रदेशानुसार जरी भाषेचे स्वरूप असे बदलत असले तरी समाजातील लेखन व्यवहाराची भाषा कुठे तरी एक आणि समान असावी लागते. तिच्या लेखन रुपात एकसूत्रता, समानता राहावी यासाठी लेखन व्य्व्हारापुरते तरी काही संकेत पाळण्याची आवश्यकता असते. याकरिता काही लेखन विषयक नियम केले आहेत.

‘शुध्दलेखन’ हा वेगळा असा विषय नाहीच. व्याकरणाचाच तो एक भाग आहे.

‘व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुध्दलेखन’

शुध्दलेखनविषयक नियमांत आपण ऱ्हस्व, दीर्घ व अनुस्वार यांचाच प्रामुख्याने विचार करतो. भाषा ही प्रवाही आहे. कालपरत्वे भाषेत बदल होत जातो. म्हणजे तिच्या लेखन पद्धतीतही बदल होणे साहजिकच आहे. पूर्वीच्या लेखनपद्धतीत व आजच्या लेखनपद्धतीत खूपच फरक आढळेल. आज लेखन विषयक जे सरकारमान्य नियम आहेत त्यांनाच म. सा. महामंडळाचे नियम म्हटले जाते. विद्यार्थ्यांनी त्यांचा निट अभ्यास करावा. व आपले लेखन जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा.

लेखन विषयक नियमांचे चार भाग केलेले आहेत.

  1. अनुस्वार कोठे द्यावेत.
  2. शब्दांच्या शेवटी येणारे इ-कार व उ-कार केव्हा ऱ्हस्व व दीर्घ लिहावेत.
  3. उपान्त्य अक्षरातील येणारे इ-कार व उ-कार कसा लिहावा ?
  4. इतर नियम

१) अनुस्वार

ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो ; त्या अक्षरांवर अनुस्वार द्यावा . (स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.)

उदा. आंबा, तंतू, घंटा, सुंठ, गंमत, करंजी, गुलकंद, गंगा, कुंकू, तंटा, चिंच, उंट, कंकण, निबंध, अलंकार

संस्कृतमधुन मराठीत जसेच्या तसे आलेल्या (तत्सम) शब्दांतील अनुस्वार परसवर्णाने म्हणजेच पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील पंचमवर्णाने लिहिण्यास हरकत नाही.

उदा. गंगा – गङगा, कुंज – कुज्ज, घंटा – घण्टा, अंत – अन्त चंपक – चम्पक, चंड – चण्ड

शब्दांतील अनुनासिकांबद्दल विकलपाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही.

परसवर्ण

क – वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक ङ्
च – वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक ञ्
ट - वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक ण्
त - वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक न्
प - वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक म्

शब्दांमध्ये ‘क’ वर्गातील अक्षरापुर्वी सानुनासिक आल्यास ‘क’ वर्गातील सानुनासिकाचा उच्चार होतो.

क – वर्ग कंकण – कङ कण
च – वर्ग चंचल - चञचाल
ट - वर्ग करंटा - करण्टा
त - वर्ग मंद - मन्द
प - वर्ग कंप – कम्प
अंतर्गत – अन्तर्गत
पंडित – पण्डित
सूचना – वेदान्त, सुखान्त, दुखान्त, देहान्त, वृतान्त, स्वरान्त, व्यंजनान्त हे शब्द असेच लिहावेत.

य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.

उदा. सिंह, संयम, मांस, संशय, संज्ञा, कंस, संरक्षण, संवाद वरील नियमातून ‘ष’ वगळावा कारण या अक्षरांपुर्वी अनुस्वार येणारा शब्द मराठी नाही.

नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावतांना अनुस्वार द्यावा.

एकवचन – मुलास, घरात, त्याचा, त्यासाठी, देशासाठी
अनेकवचनी – मुलांस, घरांत, त्यांचा, त्यांसाठी, देशांसाठी

वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.

रूढी म्हणून – पहांट, केंस, झोंप, एकदां, लांकुड, धांव, येंक, नाहीं, काहीं
व्युत्यत्तीमुळे – नांव, पांच, घांट, गांव, कांटा, सांवळा, कोंवळा, गहूं
व्याकरणिक – केळं, केळीं, वासरूं, तिनें, घरांत, जेथें, तेव्हां

थोडक्यात – स्पष्ट उच्चारल्या जाणाऱ्या अनुनासिकांवर व नामे आणि सर्वनामे यांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर येणाऱ्या अनुस्वारांखेरीज आता कोठेही अनुस्वार देण्याची गरज नाही.

२) ऱ्हस्व – दीर्घ (अन्त्य अक्षरे)

१) एकाक्षरी शब्दातील इ–कार किंवा उ–कार दीर्घ उच्चारला जातो. म्हणून तो दीर्घ लिहावा. 
उदा. मी, ही, तू, धू, जू, ऊ, ती, जी, पी, बी, पू, रु,

२) मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इ–कार किंवा उ–कार उच्चारानुसार दीर्घ लिहावा. 
उदा. आई, वाटी, टोपी, चेंडू, वाळू, खेळू, पिशवी

३) कवि, हरि, गुरु, वायु, प्रीती यासारखे तत्सम (ऱ्हस्व, इ–कारान्त व उ–कारान्त शब्द मराठीच्या स्वभावानुरूप दीर्घान्त उच्चारले जातात म्हणून तेही आता दीर्घान्त लिहावेत. 
अ – कवी, मती, गती, गुरु, पशू, सृष्टी, वाहू
आ – पाटी, पैलू, जादू, विनंती
अपवाद आणि, नि
इ – तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत. परंतु यथामति, यथाशक्ती, तथापि

४) व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे शब्द (तत्सम) जरी मुळात ऱ्हस्वान्त असले तरी ते मराठीत दीर्घान्त लिहावेत.
हरी, अन्योक्ती, अतिथी, विभक्ती, संधी, कुलगुरू इ.

५) मात्र सामासिक व साधित शब्दातील पहिले पद (ऱ्हस्व) इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असले तर ते ऱ्हस्वान्तच लिहावेत. 
कविराज, लघुकथा, वायुपुत्र, मृत्युलेख, गुरुदक्षिणा, भक्तीपर, हरिकृपा, शत्रुपक्ष, पशुपक्षी, रविवार, भानुविलास, गतिमान,

६) सामासिक व साधित शब्दातील पहिले पद (दीर्घ) इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असेल तर ते दीर्घान्तच लिहावे.
उदा. लक्ष्मीपुत्र, महीपाल, पृथ्वीतल, भूगोल, वधूपरीक्षा, वाणीवैभव, गौरीहर, दासीजन

७) विद्यार्थीन्, प्राणिन्, पक्षिन्, यासारखे इन्-अन्त शब्द मराठीत येताना त्यांचा शेवटचा न् चा लोप होतो व उपान्त ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. विद्यार्थी, प्राणी, पक्षी, मंत्री गुणी, धनी, योगी, स्वामी, परंतु हे शब्द समासातील पहिल्या पदाच्या जागी आले तर ते ऱ्हस्वान्तच ठेवावे.
उदा. विद्यार्थीगृह, प्राणिसंग्रह, पक्षिगण, मंत्रीमंडळ, स्वामिभक्त योगिराज.

८) पुढील तत्सम अव्यय व ‘नि’, ‘आणि’ ही दोन मराठी अव्यये ऱ्हस्वान्तच लिहावी.
उदा. परंतु, तथापि, अति, यद्यपि, यथामती, नि, आणि, (इत्यादी, हा शब्द अव्यय नसल्यामुळे तो दीर्घान्त लिहावा.

३) ऱ्हस्व दीर्घ (उपान्त्य अक्षरे)

१) मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीच इ-कार व उ-कार दीर्घ असतात.
उदा. खीर, पीठ, फूल, सून, गरीब, कठीण, नाईक, हुरूप, विहीर

२) पण तत्सम शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इ-कार व उ-कार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे ऱ्हस्वच राहतात. 
उदा. गुण, युग, विष, प्रिय, मधुर, बहुत, मंदिर, अनिल परिचित

३) मराठी शब्दांतील अन्त्य अक्षर दीर्घ स्वरान्त असेल तर उपान्त्य इ-कार व उ-कार ऱ्हस्व असतो.

४) पण तत्सम शब्दांतील उपान्त्य अक्षरे दीर्घ असतील तर ती मूळ संस्कृतातील शब्दांप्रमाणेच दीर्घ ठेवावी.
उदा. पूजा, भीती, प्रीती, पूर्व, दीप, पीडा, नवीन, संगीत, नीती, कीर्ती

४) सामान्यरूप

१) इ-कारान्त व उ-कारान्त तत्सम शब्दाचे सामान्यरूप करतांना अन्त्य स्वर दीर्घ होतो.
उदा. कवि-कवीला-कवीसाठी, गुरु-गुरूचा-गुरूपेक्षा

२) मराठी शब्दाचे उपान्त्य अक्षर (दीर्घ) ई किंवा ऊ-युक्त असेल तर त्याचे सामान्यरूप करतांना ते उपान्त्य अक्षर ऱ्हस्व उच्चारले तर त्याचे सामान्यरुप करतांना ते उपान्त्य अक्षर ऱ्हस्व उच्चारले जाते म्हणून ते ऱ्हस्वच लिहावे. 
उदा. सून-सुनेला, चूल-चुलीपुढे, बहिण-बहिणीचा

३) पण तत्सम शब्दांचे उपान्त्य अक्षर (दीर्घ) ई किंवा ऊ-युक्त असेल तर त्याचे सामान्यरूप करतांना ते दीर्घच लिहावे. उदा. गीता-गीतेचा-गीतेप्रमाणे, पूर्व-पूर्वेला-पूर्वेकडे

५) इतर

१) ए-कारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त करावे. 
उदा. करणे-करण्यासाठी, पाहणे-पाहण्यास, भावे-भाव्याचा

२) पुढील विशिष्ट शब्द खालीलप्रमाणे लिहावे. 
उदा. नागपूर, एखादा, कोणता, हळूहळू, मुळूमुळू

३) लेखनात पत्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते त्यावेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे.
उदा. तो म्हणाला “मला असं वाटतं, की त्यांचं म्हणण खरं असावं.”

४) पुढील तत्सम शब्द मुळातल्याप्रमाणे व्यंजनान्त्य लिहिण्याची प्रथा होती. असे शब्द आता आकारान्त लिहावेत. 
उदा. अर्थात, क्वचित, साक्षात, विद्वान, कदाचित, परिषद, पश्चात, किंचित, सम्राट, श्रीमान, भगवान

५) परकीय भाषेतील शब्द मराठीत लिहितांना ते त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लिहावेत.

६) कवितेमध्ये ऱ्हस्व दीर्घाचे बंधन पाळता येत नसल्यामुळे वृत्तानुसार ऱ्हस्वदीर्घ लिहावेत.

७) राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे लिहावी. मात्र आज्ञार्थी रूपे लिहितांना राहा, पाहा, वाहा, याबरोबरच रहा, पहा, वहा, ही रूपे लिहिण्यास हरकत नाही.

८) ही हे शब्दयोगी अव्यय दीर्घान्त लिहावे. ‘अन्’ हा शब्द व्यंजनान्त लिहावा.

६) लेखनातील शब्दांच्या सामान्य चुका

शुध्दलेखनाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे चुका होतात ही गोष्ट खरी शिवाय जे शिवाय जे शब्द आपण वापरतो त्या शब्दांच्या लेखनातही अशुद्धता बरीच असते. त्याला विविध करणे आहेत.

१) संस्कृतभाषेचे अज्ञान २) हिंदी भाषेचा परिचय ३) विसर्गाचा घोटाळा ४) वर्णाचा उच्चार करताना होणाऱ्या चुका ५) वर्णाच्या अनुक्रमातील बदल .

अशा अनेक कारणांमुळे आपल्या लेखनात चुका होतात. त्या शक्यतो टाळाव्यात.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------