Yojana

महिला उद्योजकांसाठी देशातील प्रोत्साहन धोरण

औद्योगिक विकासासाठी राज्यात तयार करण्यात आलेल्या पोषक वातावरणाचा लाभ महिला उद्योजकांना मिळावा आणि त्यातून महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष धोरण राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये महिला उद्योजकांना तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि आर्थिक साहाय्य पुरवून उद्योग व रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राज्याने लागू केलेल्या अशा प्रकारच्या धोरणाची देशात प्रथमच अंमलबजावणी होत आहे. या धोरणातील महत्त्वाच्या तरतुदी खालीलप्रमाणे…

या योजनेचा लाभ एकल मालकी, भागीदारी, सहकारीक्षेत्र, खासगी किंवा सार्वजनिक मर्यादित घटक आणि स्वयंसाहाय्यता बचतगट यांना मिळणार आहे.

या घटकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये किमान ५० टक्के महिला कामगार असणे आवश्यक आहे.

या योजनेच्या लाभासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकास अधिनियम – २००६अंतर्गत येणारे उत्पादनक्षम उद्योग आणि सामूहिक प्रोत्साहन – २०१३ मधील उपक्रम पात्र ठरू शकतात.

सामूहिक प्रोत्साहन योजना – २०१३ अंतर्गत अतिरिक्त सवलती दिल्या जाणार आहेत. नवीन उपक्रमांना या योजनेतील तालुका वर्गीकरणानुसार देय असलेल्या स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या १५ ते ३५ टक्के दराने २० ते १०० लाखापर्यंत भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. उत्पादन सुरू झाल्यापासून पाच समान वार्षकि हप्त्यांमध्ये त्याचे वितरण करण्यात येईल.

विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांसह कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमधील उद्योगांना प्रत्येक युनिट विजेमागे दोन रुपये आणि राज्यातील इतर जिल्ह्य़ांतील उद्योगांना प्रत्येक युनिट विजेमागे एक रुपया एवढी सवलत पाच वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे.

सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांना स्थावर मालमत्ता संपादन करण्यासाठी बँका व सार्वजनिक वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या मुदत कर्जावर प्रत्यक्ष भरणा केलेल्या व्याजासाठी ५ टक्क्यांपर्यंत व्याजदर अनुदान देण्यात येईल.

पात्र उद्योगातील महिला कामगारांसाठी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी किंवा राज्य कामगार कल्याण योजनेमध्ये जे कंपनीचे योगदान असेल त्याच्या ५० टक्क्यांपर्यंत पाच वर्षांच्या कालावधीसाठी अनुदान देण्यात येईल.

उत्पादनांचे विपणन होण्यासाठी मुद्राचिन्ह विकसित करण्यासाठी केलेल्या खर्चाच्या ५० टक्के व कमाल एक कोटीपर्यंत शासनाकडून साहाय्य देण्यात येईल.

देशभरातील प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी महिला उद्योगांना ५० हजार किंवा प्रदर्शनातील गाळ्याच्या भाडय़ाच्या ७५ टक्के रक्कम व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी तीन लाखाच्या मर्यादेत सवलत देण्यात येईल.

महिला उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनासाठी खर्चाच्या ५० टक्के रक्कम कमाल १० लाखाच्या मर्यादेत साहाय्य देण्यात येईल.

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर महिला उद्योजकांसाठी महाराष्ट्रात कमाल ३ ठिकाणी इन्क्युबेटर्स स्थापन करण्यात येतील.

माहिती-तंत्रज्ञान पुरस्कारांच्या धर्तीवर व्यवसायातील सर्वोत्तमतेसाठी महिला उद्योजकांना वेगळ्या संवर्गामध्ये पुरस्कार देण्यात येतील.

महिला व बाल कल्याण विभागाकडून महिला उद्योजकांसाठी ५० कोटीचा विशेष साहस निधी तयार करण्यात येईल.

प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला उत्पादन सुरू झाल्यानंतर सुरुवातीची तीन वर्षे प्रशिक्षणासाठी दर वर्षी तीन हजार रुपयांची मदत करण्यात येईल. हे साहाय्य प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेशी जोडण्यात येणार आहे.

आनुषंगिक मुद्दे

या धोरणामुळे राज्यातील महिला संचालित उद्योगांचे प्रमाण ९ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढविणे शक्य होणार आहे. तसेच आगामी पाच वर्षांत १५ ते २०हजार महिला उद्योजकांमार्फत दोन हजार कोटी मूल्याची गुंतवणूक व एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत.

शाश्वत आर्थिक व सामाजिक विकासात महिला उद्योजकांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, महिलांना उद्योग-व्यवसाय उभारणी करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये तांत्रिक व व्यवस्थापकीय ज्ञानाचा अभाव, मार्यादित आर्थिक स्रोत व गुंतवणूक साहाय्य, परवडण्यायोग्य व सुरक्षित जागांचा अभाव इत्यादींचा समावेश आहे. राज्याचा सर्वसमावेशक विकास करताना महिला संचालित उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक बदल घडविण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यामध्ये महिला उद्योजकांच्या दृष्टीने मत्रीपूर्ण व पूरक-पोषक वातावरण तयार करण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव><शहराचे नाव><नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------