अर्थपूर्ण व सुसूत्र मांडणी असलेला निबंध लिहिण्यासाठी खालील टप्प्यांचा वापर करावा लागतो. आज आपण त्यातील काही टप्प्यांची माहिती करून घेणार आहोत.
१) आराखडा
पेपरमध्ये दिलेले सर्व निबंध विषय काळजीपूर्वक वाचावेत. ज्या विषयाबद्दल आपल्याला पुरेसा आत्मविश्वास वाटतो तो विषय निश्चित करावा. एकदा विषय नक्की करून लिखाणास सुरुवात केल्यानंतर पुन्हा विषय बदलला जाऊ शकत नाही. विषय निश्चित करत असताना, त्या विषयाबद्दल आपल्याला किती माहिती आहे व एकंदरीतच त्या विषयाचे लिखाण करण्याकडे आपला किती कल आहे याचा अंदाज घ्यावा. सुरुवातीची २० ते ३० मिनिटे विषय निश्चित करण्यात व कच्चा मसुदा तयार करण्यात गेली तरी हरकत नाही. कच्चे काम करण्यासाठी उत्तरपत्रिकेमध्ये जागा दिलेली असते. निबंधविषयाशी संबंधित मुद्यांचे टिपण काढून कच्चा आराखडा तयार करावा. निबंधामध्ये येणाऱ्या सर्व प्रमुख मुद्यांचा यामध्ये समावेश असावा. यातून लिखाणाला नक्कीच दिशा मिळण्यास मदत होते. तीन तास सलग लिखाण करण्याकरिता अशा नियोजनाची व त्यास अनुसरून मांडणी करण्याची नितांत गरज असते.
एकदा लेखनाची रचना ठरली की, त्याप्रमाणे एकसमान लयीत मांडणी करावी. अनेकदा लिहित असताना नवीन मुद्दे, संदर्भ आठवतात. त्यांचा लिखाणात जरूर समावेश करावा. मात्र असे करत असताना मूळ रचनेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. असे नियोजन केल्याने लेखन करण्याआधी विषयासंबंधीचा पूर्ण विचार केला जातो. संपूर्ण निबंध लिहून झाल्यानंतर जर असे लक्षात आले की, नियोजनावर अजून थोडा वेळ खर्च करायला हवा होता तरी त्याचा काही उपयोग नाही. मुक्त शैलीत निबंध लिहिल्यास, नंतर आढावा घेत असताना काही परिच्छेद गाळायला हवेत असे वाटल्यास काहीही केले जाऊ शकत नाही. अशा सर्व प्रकारचे रचनेतील बदल आराखडय़ाच्या टप्प्यावरच करणे शक्य आहे. अशा प्रकारे उत्तम नियोजनानंतर लेखन करत असताना विचार करण्यात खूप वेळ खर्च होत नाही. लेखनाच्या मांडणीकडे, शब्दांच्या वापराकडे पुरेसे लक्ष दिले जाते. अर्थातच लिहीत असताना झालेल्या लिखाणाचा आढावा घेणे आवश्यक असते.
२) मूळ हेतू /प्रमुख दावा
निवडलेल्या विषयासंबंधी कोणता प्रमुख मुद्दा आपल्याला सांगायचा आहे हे निश्चित केले पाहिजे. आपण सांगत असलेला मुद्दा ठामपणे सांगण्यामागील मूळ हेतू कोणता, याबद्दल लिखाणात स्पष्टता असणे आवश्यक आहे. यामधून वाचणाऱ्याला लेखनाची एकंदरीत दिशा कोणती हे समजण्यास मदत होते. एकंदरीतच स्पष्ट मूळ हेतूशिवाय चांगला निबंध लिहिणे अशक्य आहे. हा प्रमुख मुद्दा/दावा पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी येणे अपेक्षित आहे. विषयाच्या सुरुवातीला जी तोंडओळख करून दिली जाते त्याला जोडूनच हे ठाम मत येणे आवश्यक आहे. पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी हे विधान असण्याची वाचक किंवा निबंध तपासणारी व्यक्ती अपेक्षा करते. एकदा प्रमुख मुद्दा लक्षात आल्यानंतर त्या संदर्भातील अधिक बारकावे असलेला युक्तिवाद निबंधात असेल अशी अपेक्षा केली जाते.
३)युक्तीवादात्मक दावा (Arguable Claim)
तुम्ही मांडत असलेले ठाम मत युक्तिवादात्मक असावे. तसेच हे मत मांडत असताना तुमचे लेखन त्या विषयावरील अधिक बारकावे व खोली असणाऱ्या चच्रेचा भाग होऊ शकते असे असावे. आपले मत युक्तिवादात्मक आहे किंवा नाही हे ठरवण्याकरता, आपल्या मताच्या विरुद्ध मताचे समर्थन केले जाऊ शकते का? असा विचार केला पाहिजे. जर का आपण मांडत असलेल्या मुद्यांच्या विरोधी कोणतेही मत अथवा युक्तिवाद शक्य नसेल तर, आपला मुद्दा केवळ ‘माहिती’ असण्याची शक्यता आहे.
अ-युक्तिवादात्मक (Non -Arguable Claim) – संगणक हे कामकाज सांभाळण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. तसेच माहितीच्या देवाणघेवाणीसाठी अतिशय उपयुक्त असे साधन आहे. (याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. म्हणूनच हे विधान म्हणजे केवळ माहिती आहे.)
युक्तिवादात्मक (Arguable Claim) – संगणकाच्या अतिवापरामुळे कुटुंबातील शांतता भंग होऊ शकते. तसेच घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाचे हे एक कारण असू शकते. (विविध माहिती व आकडेवारी सादर करून वरील विधानाचे समर्थन केले जाऊ शकते. तसेच वरील विधान असत्य मानणे व त्याबाजूने युक्तिवाद करणे शक्य असू शकते.)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------