Geography

भूगोलाची परीक्षाभिमुख तयारी

विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेखात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्वसाधारण रणनीती काय असली पाहिजे, याची माहिती घेतली. या लेखात आपण आजपर्यंत आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचे घटक, त्यांचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टींवर भर द्यावा आणि परीक्षेला जाता जाता नेमक्या कोणत्या मुद्दय़ांकडे लक्ष द्यावे, याविषयी विस्तृत चर्चा करू या. पुढे महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा तसेच प्राकृतिक व संकल्पनात्मक भूगोल अभ्यासण्यासाठी महत्त्वाच्या आणि पाहिलेच पाहिजेत अशा मुद्दय़ांची यादी दिली आहे.

जगाचा भूगोल

या विभागात आजपर्यंत राज्यसेवा पूर्वपरीक्षेत जगात घेतली जाणारी चहासारखी नगदी पिके आणि त्यांची वैशिष्टय़े, अग्निकंकणाचा भाग असणारे प्रदेश, स्थानिक वारे, क्षारतेनुसार समुद्रांचा क्रम, विविध आखाते, सामुद्रधुनी आणि महासागर, हवामान प्रदेश, भूरूपे, नद्या, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारे आणि त्यांची वैशिष्टय़े, विविध भागांत आढळणारे विशिष्ट संस्कृतींचे लोक आणि प्रदेश या उपघटकांवर आधारित प्रश्न विचारले आहेत.

भारताचा भूगोल

या विभागात साधारणपणे भारतातील मृदा समस्या, मासेमारी, वस्त्या (मानवी भूगोल), नद्यांची खोरी – त्यांचा आकार, हवामान, पशुधन, महत्त्वाची शहरे – त्यांची टोपणनावे, लोकसंख्या वितरण, साक्षरता, कृषीचे प्रकार, वने, प्रमुख पिके – नगदी व अन्नधान्य – त्यांचे वितरण, विकसित बंदरे, व्यापारी केंद्रे, आदिवासी जमाती – राज्ये, पठारे, पर्वतरांगा, पर्जन्य, धबधबे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे कृषी क्षेत्रातील विविध क्रांती या उपघटकांवर विशेष भर दिला आहे.

महाराष्ट्राचा भूगोल

या विभागावर राज्यसेवा परीक्षेत आजपर्यंत फारसे प्रश्न विचारले नाहीत तरी या विभागाकडे योग्य ते लक्ष देण्यासाठी पुढील घटक अभ्यासणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, मृदा, हवामान, पर्वतरांगा, नद्या, खाडय़ा, बंदरे, राष्ट्रीय महामार्ग आणि त्यांच्या काठावर वसलेली शहरे, लोकसंख्या वितरण, पिके, शेती, उद्योग, वाहतूक, संदेशवहन व पर्यटन. २०१३ साली परीक्षेचे स्वरूप बदलल्यापासून या घटकावरील प्रश्नांची संख्या जरी कमी असली तरी वरील अपेक्षित घटकांचा अभ्यास करणे अपरिहार्य ठरते.

प्राकृतिक व संकल्पनात्मक भूगोलाची तयारी

भूगोलाच्या या विभागांतर्गत पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधित परिकल्पना आणि त्यांचे निर्माते तत्त्ववेत्ते, पृथ्वीचे अंतरंग आणि त्यातील विविध स्तरांवरील दाब, तापमान असे भौतिक गुणधर्म, सांद्रीभवन आणि सांद्रीभवनादरम्यान उत्सर्जति होणारी ऊर्जा, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण झालेल्या पृथ्वीच्या विशिष्ट स्थिती (संपात दिन, आयन दिन) मृदा, हवामान, वने, पर्वतरांगा तसेच नदी, वारा, समुद्रलाटा, हिमनद्या यांच्याद्वारा निर्मित भूरूपे, सूर्यमालेतील इतर ग्रहांची वैशिष्टय़े, ज्वालामुखी, भूअंतर्गत हालचाली, बंदरे, सागरी प्रवाह यांच्याबद्दलची माहिती विचारली जाते. या घटकांचा अभ्यास करताना नकाशावाचनाद्वारे कोऱ्या नकाशांवर शक्य त्या ठिकाणी वरील घटकांची माहिती भरून ते नकाशे या शेवटच्या दिवसांत दररोज पाहावेत. जेणेकरून ते आपल्या चित्ररूपी स्मृतीत साठवले जातील आणि परीक्षेच्या वेळी सहज आठवतील.

परीक्षेला जाता जाता

राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी भूगोल या विषयाचा अभ्यास करण्यासाठी योग्य रणनीती आखावी. ज्यामुळे या विषयावर येणाऱ्या १२ ते १५ प्रश्नांना सामोरे जाणे निश्चितच शक्य होईल.

त्यासाठी खालील महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

१) दिलेला अभ्यासक्रम नीट पाहणे.

२) चालू घडामोडींची दिलेल्या अभ्यासक्रमाशी सांगड घालणे.

३) सरावासाठी प्राकृतिक भूगोलातील घटकांचे नकाशे तयार करून नियमितपणे पाहणे.

४) नद्यांचा, पर्वतरांगांचा, खाडय़ांचा, बंदरांचा दक्षिणोत्तर वा उत्तर-दक्षिण तसेच पूर्व-पश्चिम वा पश्चिम-पूर्व क्रम ध्यानात ठेवणे.

५)  जाता-जाता कोणते उपघटक कोणत्या स्रोतामधून वाचायचे आहेत त्याची यादी बनविणे. ते घटक पूर्णपणे वाचून त्यांची वारंवार उजळणी करणे. त्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेणे.

६) या घटकांचा अभ्यास करताना महाराष्ट्र – पाठय़पुस्तक महामंडळाची चौथी ते बारावीपर्यंतची भूगोलाची पुस्तके तसेच एनसीआरटीची अकरावी आणि बारावीची भूगोलाची पुस्तके आणि त्यामधील नकाशे अत्यंत उपयुक्त ठरतात.

भूगोल या विषयावर पूर्वपरीक्षेमध्ये बहुविधानात्मक तसेच ‘जोडय़ा जुळवा’ आणि नकाशावर आधारित प्रश्नांची संख्या अधिक प्रमाणात असल्यामुळे असे प्रश्न सोडविण्याचा सराव करणे अत्यंत आवश्यक ठरते. त्याचबरोबर प्रश्नांचे चिकित्सक विश्लेषण करून त्यामधून निर्माण होणाऱ्या उपप्रश्नांचे आडाखे बांधून चौफेर विचारमंथन करणे अत्यंत आवश्यक ठरते. यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचा तोच पर्याय का बरोबर आहे? तो प्रश्न का आला असावा? त्या दृष्टीने या वर्षी कोणता प्रश्न येऊ शकेल? आला तर कसा येईल, हा प्रश्न कसा सोडवावा, यासाठी कोणता अभ्यास केला पाहिजे, या प्रश्नांची उत्तरे मिळवून योग्य रणनीतीने अभ्यास केल्यास या विषयात जास्तीत जास्त गुण मिळविणे सहज साध्य आहे.