यावेळेस आपण उपयुक्ततावादी सिद्धांतापासून फारकत घेणारा कर्तव्यवादी सिद्धांत (Deontological theory) पाहणार आहोत. इमॅन्युएल कान्ट या जर्मन विचारवंतांनी कर्तव्यवादाचा मोठा पुरस्कार केला. त्याच विचारप्रणालीचा एक भाग म्हणून कान्टने ‘नितांत आवश्यकतावाद’ ही संकल्पना मांडली. या सिद्धांताचा मूळ विचार असं सांगतो की, काही कृती या मूलत:च चुकीच्या असतात. अशा कृतींचे परिणाम कितीही ‘चांगले’ असले तरी कृतींचे मूळ स्वरूप हे अयोग्यच असते. अशा कृतीची ‘नैतिक गरज’ जरी प्रस्थापित करता आली तरीदेखील ती कृती चुकीचीच ठरते असं मानणारा हा विचारप्रवाह आहे.
प्रयोजनवादी विचारांमध्ये कृतीचे प्रयोजन, ध्येय, अंतिम परिणाम याला सर्वात जास्त महत्त्व आहे. अशा विचाराप्रमाणे ज्या कृतीतून चांगले परिणाम साधले जातात, अशा कृती ‘चांगल्या’ किंवा ‘योग्य’ मानल्या जातात. कर्तव्यवादी व्यक्तीसाठी काय करावे व काय करू नये हे पूर्णत: ‘कर्तव्यावर’ आणि ज्या व्यक्तीसाठी कृती करायची आहे तिच्या गरजेवर अवलंबून असते. व्यक्ती जेव्हा गरजेची नसतानाही एखादी ‘चांगली’ कृती करते, तेव्हा त्या कृतीला ‘कर्तव्यातीत’ कृती असे संबोधले जाते.
कर्तव्य का करावे? असा प्रश्न पडल्यास कर्तव्य चुकविल्याने नुकसान होईल किंवा शिक्षा होईल असे उत्तर येऊ शकते. परंतु असा विचार केल्यास हे लक्षात येईल की प्रस्तुत उत्तर हेसुद्धा परिणामांचा विचार करण्यातून पुढे आले आहे. त्यामुळे ते प्रयोजनवादी ठरते. कर्तव्य हे परिणामांच्या भीतीमुळे नाही तर कर्तव्याच्या जाणिवेतून करावे असे कर्तव्यवाद सांगतो. म्हणजे ‘अमुक एक टाळायचे असेल तर’ – किंवा ‘अमुक एक हवे असेल तर’ – अशी अट त्याला असू नये तर कर्तव्य हे स्वतंत्र असावे, असे कर्तव्यवाद म्हणतो.
इमॅन्युएल कान्टच्या मते जी व्यक्ती ‘नैतिक नियमांचे’ पालन करते ती ‘चांगली’ व्यक्ती होय. नैतिक नियमांचे पालन हे कर्तव्य मानावे असे कान्ट सांगतो. आणि नैतिक नियमांचे पालन हे नातेसंबंधांशी व व्यक्तिगत गुणांशी संबंधित नसावे. कृती करण्यासाठी एकमात्र उद्देश असावा तो म्हणजे कर्तव्य. संबंधित कृती करताना माझ्याऐवजी दुसरी कुठलीही व्यक्ती असती तर ही कृती पार पाडणे हेच तिचे कर्तव्य असले असते – ही भावना म्हणजेच नैतिक नियमांची वैश्विकता होय.
मात्र असे नैतिक नियम बनवणे, जे स्थळकाळाच्या फरकाशिवायही लागू करता येतील, हे फारच जोखमीचे काम आहे. तसेच कर्तव्याची व्याख्या निश्चित करणे हेसुद्धा सोपे नव्हे. तरीदेखील काही नितांत आवश्यक असे नैतिक नियम बनवू शकतो का हा प्रश्न नक्कीच उरतो. असे नितांत आवश्यक नैतिक नियम बनविण्याकरिता कोणते निकष वापरले जाऊ शकतात, याचा सखोल विचार कान्टने केला. कान्टने नितांत आवश्यकतावादाच्या मांडणीत त्याच्या कर्तव्याबद्दलच्या संकल्पनांचाही समावेश केला. कान्टने केलेली मांडणी लक्षात घेत असतानाच नागरी सेवांमध्ये कर्तव्य आणि नितांत आवश्यक नीतिमूल्यांचे काय स्थान आहे यावरही ऊहापोह करणे शक्य होते. आपण प्रयोजनवादी नैतिक सिद्धांताचा अभ्यास केला. सुख हे प्राप्तव्य व हितकारक असते, असा दावा ते करतात. सुख हवे असते, माणूस सुखाची इच्छा करतो असे प्रयोजनवादी सिद्धांत सांगतो.
आता व्यक्तीचे कर्तव्य किंवा समाजाचे कर्तव्य काय असावे हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कर्तव्य म्हणजे काय? ते कसे करावे? आणि का करावे? याविषयी इमॅन्युएल कान्ट यांचे चिंतन महत्त्वाचे आहे. कान्ट कर्तव्यावर भर देतो आणि कर्तव्यवादी नीतिशास्त्राची मांडणी करतो.
इमॅन्युअल कान्ट (१७२४- १८०४)
मूळच्या जर्मन असलेल्या कान्टने नीतिनियमविषयक अनेक महत्त्वाच्या सद्धांतिक मांडण्यामध्ये मोलाची भर घातली. मनुष्याने स्वततील पशुवत इच्छा आपल्याला मिळालेल्या ताíकक विचाराच्या साहाय्याने नष्ट कराव्यात, असा प्रमुख विचार कान्टने मांडला. हे करत असतानाच संतुलित समाजव्यवस्था निर्माण करण्याकरता उच्च नैतिक व नीतिनियम विषयक चौकट (Moral and ethical framework) निश्चित करावी. कान्टचे नैतिक विचाराच्या क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान म्हणजे उपयुक्ततावादाचे त्याने केलेले खंडन होय.
उपयुक्ततावादातील मुख्य त्रुटी म्हणजे त्यातील संख्यात्मक मुद्यांना दिलेले महत्त्व व गुणात्मक आणि नैतिक मूल्यांकडे केलेला कानाडोळा ऐरणीवर आणण्याचे महत्त्वाचे काम कान्टने केले. नैतिकतेचा कोणताही आधार नसलेली समाजव्यवस्था केवळ संख्यात्मक बळावर प्रगती करू शकत नाही व म्हणूनच नैतिक मूल्ये जोपासणे हे समाजहितासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
‘सुख म्हणजे काय?’ याचे कर्तव्यवादाचे उत्तर इतरांपेक्षा वेगळे असेल. साधारणत: सुख प्रत्येकाला प्रिय असते, म्हणून चांगले असते. असा एक ढोबळ निष्कर्ष काढला जातो. कान्ट असा प्रश्न विचारतो की सुखाची इच्छा नैतिक असते का? खरोखरच सुख चांगले असते का? सुखाचा चांगुलपणा नेमका कशावर अवलंबून आहे. कारण समजा उदा. तिकीट न काढता प्रवास करणे, खाऊन पिऊन कँटिनवाल्याची नजर चुकवून पसार होणे, दरोडे घालणे ही सगळी कृत्ये सुखदायी असतात. पण अनैतिक असतात म्हणून सुख नेहमीच चांगले असते असे नाही. चांगुलपणा विवेकाने ठरवावा लागतो. विवेकशक्ती आपणास गणिती ज्ञानासारखे स्थळकाळ व्यक्ती निरपेक्ष सत्यज्ञान देते. तसे सुखाचे मूल्य नसते. चांगुलपणा हा विवेकनिष्ठ असेल तर सुखसुद्धा विवेकनिष्ठच असले पाहिजे. कशावर तरी अवलंबून असलेले सुख हे सुख असतेच असे नाही. म्हणून ते ध्येय होऊ शकत नाही. माणसाचे खरे ध्येय स्थळकाळ व्यक्तिनिरपेक्ष सुख हे असले पाहिजे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव><शहराचे नाव><नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------